सत्य हृदयातील या सांगायचे आहे कुठे?
गीत माझ्या अंतरीचे गायचे आहे कुठे?
शोधतो आहे जरी मी मार्ग वेड्यासारखे
हे कधी कळलेच नाही जायचे आहे कुठे?
घट्ट मी मिटले जरी डोळे बघाया स्वप्न ते
लाजर्या स्वप्नासही स्पंदायचे आहे कुठे?
शोधलेली उत्तरे हाती जरी आली तरी
मोकळे आकाश हे वाटायचे आहे कुठे?
रोखले आहे अता मी स्पंदणे हृदयातले
तू जसे देशील ते भोगायचे आहे कुठे?