सूतपुत्राचे दान

प्रसाद शिरगांवकर

स्पर्शता तू आज मी बेभान झालो
आसमंती दाटले तूफान झालो

या तुझ्या ओठांस राणी स्पर्शण्या
मी पहाटे छेडलेली तान झालो

ज्योत तू आहेस राणी तेवणारी
मी सुरांनी पेटलेले रान झालो

टाकला मी प्राण त्या झोळीत ऐसा
सूतपुत्राने दिलेले दान झालो

नाचतो आहे जरी पडतो तरीही
मोगर्‍याचे मी पुराणे पान झालो

Average: 8.7 (107 votes)