लवंगीच्या सरींचा एक आख्खा गठ्ठा
पूर्णपणे सुट्टा करून
त्यातला एक एक लवंगी
दुपारभर उडवत रहाणं
त्यातही शक्यतो प्रत्येक लवंगी
हातात पेटवून फेकणं
जे शेजारी आजोबा
वर्षभर लहानमुलांना छळतात
त्यांच्या खिडकीपाशी रात्री बेरात्री
सुतळी बॉम्ब किंवा गेला बाजार लवंगीची माळ लावणं
रस्त्यावरच्या कचऱ्यातले
न उडलेले फटाके शोधून
त्यांना पूर्ण सोलून
त्यातली दारू गोळा करून
लक्ष्मीबॉम्बचा झालेला कचरा गोळा करून
त्यावर जमा केलेली दारू पसरून
त्याची मस्त शेकोटी पेटवणं...
एखाद दुसरा बॉम्ब पेटवल्यावर
त्यावर पटकन
डबा आईसपाईसचा डबा ठेवून
नक्की काय होतंय ते बघणं!
रॉकेट उभं तर मस्त जातंच
आडवं कसं जाईल हे करून बघणं!
हे असले अतरंगी उद्योग आपण तर केले!
पण आपल्या मुलांना करू देऊ का आता?
बापाचं हृदय, बापाची काळजी
बाप झाल्याशिवाय कळत नाही
आणि मुलांना त्यांचं स्वातंत्र्य
लपूनछपून केल्याशिवाय मिळत नाही...