रोज सकाळी पेपर वाचून

प्रसाद शिरगांवकर

रोज सकाळी पेपर वाचून झाला
की रोजच मी स्वतःला मनापासून पटवून देतो

कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीच आहे
शिवसेना आणि मनसे दोन वेगळेच पक्ष आहेत
भाजप अत्यंत शिस्तप्रिय पक्ष आहे
महाराष्ट्रात इतरही अनेक चांगले पक्ष आहेत
सगळ्या पक्षांना मराठी माणसाचं भलंच करायचं आहे
महाराष्ट्र खूपच सुरक्षित, अजूनही बिहार झाला नाही इथे

आणि हो, हेही पटवून देतो स्वतःला, की
डॉ दाभोलकरांच्या हत्या प्रकरणी
महत्वाचे धागेदोरे हाती लागले आहेत
सापडतीलच मारेकरी....

मग पेपर बरोबरच, मनातल्या विचारांचीही घडी घालून ठेवून देतो
मग दिवसभर पोटापाण्याच्या लढाया लढून थकुन निजुन जातो

दुसऱ्या दिवशी, ताज्या पेपरातल्या ताज्या बातम्या वाचून
पुन्हा स्बतःला मनापासून पटवून द्यायला लागतो
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडीच आहे
शिवसेना आणि मनसे दोन वेगळेच पक्ष आहेत
सगळ्यांना मराठी माणसाचं भलंच करायचं आहे
........
........
........
आणि
डॉ दाभोलकरांचे मारेकरी सापडतीलच....

No votes yet