मी त्यांना सांगत होतो

प्रसाद शिरगांवकर

मी त्यांना सांगत होतो
दोन अधिक दोन चार...
पाण्याला रंग नसतो...
साप हा सरपटणारा प्राणी...
इत्यादी साधं सोपं गणित, शास्त्र वगैरे

ते अचानक खवळून उठले
आणि म्हणाले
'भाडखाव, आमच्या नेत्याला साप म्हणतो
चांगलं पाणी दाखवतो तुला
दोन मिनिटांत चार तुकडे करू तुझे'

मी गडबडलो, पुन्हा फळ्याकडे पाहिलं
त्यावर इतकंच होतं
दोन अधिक दोन चार...
पाण्याला रंग नसतो...
साप हा सरपटणारा प्राणी...
इत्यादी साधं सोपं गणित, शास्त्र वगैरे....

Average: 8.6 (7 votes)