प्रसाद

प्रसाद शिरगांवकर

प्रत्येक रात्र येते घेउन याद राणी
गेली किती युगे मी देतोय साद राणी

पेटून थांबलाहे ॐकार स्पर्श माझा
ऐकू तुला न येई हा ब्रम्हनाद राणी

आलो इथे कसा मी, कोणास काय सांगू
आलो कुणाकुणाशी घालून वाद राणी

या वादळात माझी होडी तरून आहे
तू एकदाच याला द्यावीस दाद राणी

प्रेमात आंधळा मी झालो तुझ्याच साठी
माफीच मागतो मी, झाला प्रमाद राणी

पूजेत साज होता माझ्याच कर्दळीचा
हाती दिला न माझ्या त्याचा प्रसाद राणी

सारे तुझ्याच साठी सोडून दूर आलो
नाही कधीच त्याचा केला विषाद राणी

Average: 8.7 (6 votes)