प्रसाद शिरगांवकर

छेडला हा सूर कोणी बासरीचा?
स्पंदला का राग माझ्या अंतरीचा?

आज मी गाउ सखे गाणे कशाला
मैफ़लीचा नूर नाही नेहमीचा

हाय, नाही आज या पेल्यात जादू
घेतला हाती घडा तू काकवीचा!

काढुनी यांच्यासवे मी जन्म माझा
चेहरा कोणीच नाही ओळखीचा

पाहुनी तव संपली माझी प्रतीक्षा
आज साथी भेटला जन्मांतरीचा

एवढी झाली आहे आता उधारी
हा न माझा श्वास माझ्या मालकीचा

एक साधे पानही हातात नाही
छाटला त्यांनी असा माझा बगीचा

Average: 6.7 (11 votes)