प्रसाद शिरगांवकर

पेलता आली मला ना स्पंदनांची पालखी
घेतली गालावरी मी आसवांची पालखी

जाणले ना मी कधीही जायचे आहे कुठे
चालली आहे कुठे ही तारकांची पालखी

घेउनी या पालखीला चालतो आहेच मी
आजही खांद्यावरी या वेदनांची पालखी

काल मी होतो कुठेसा आज मी आहे कुठे
घेउनी जाते कुठे ही संभ्रमांची पालखी

राहुनी होषीत राजा भोग तू आयुष्य हे
ठेव सांभाळून राजा जाणीवांची पालखी

काल होतो एकटा मी मोकळ्या तारांगणी
आज आहे सोबतीला अक्षरांची पालखी

काव्य नेते पंढरीला, ही नव्हे वारी नवी
ही तुक्याची पालखी ही ज्ञानियाची पालखी

Average: 6.2 (19 votes)