मी पेपर वाचत असतो
अन आकडे मोजत असतो
हे इथे कितीसे गेले
ते तिथे कितीसे गेले
कुणि कैलासाला गेले,
अल्लाला प्यारे झाले
दंग्यात कुणी जळलेले
हल्ल्यात कुणी फुटलेले
अन पूर, सुनामी कोठे
...मातीत किती पुरलेले
मी दगड होऊनी तेंव्हा
हलकेच उलटतो पाने
मग आतील पानांवरती
भेटाया धावुन येती
नेत्यांचे हसरे फोटो
फेसाळ, खुळ्या जाहिराती
मी पुन्हा उलटतो पाने
अन आतील पानांवरती
असतात भाबडी पत्रे
रस्त्यांच्या खड्ड्यांवरची
अन भटक्या कुत्र्यांवरची
अन त्यांच्या सोबत असते
संपादक मंडळ सारे
जे निषेध निक्षुन करती
कधि याचा तर कधि त्याचा
मग पुढच्या पानांवरती
मी दगड मनाने बघतो
भावांच्या वार्ता साऱ्या
शेअर बाजार सदोदित
पडलेले, कोसळलेले
पण डाळ न तांदुळ असती
गगनास सदा भिडलेले
उलटुन पान हेही मी
शेवटच्या पानी येतो
अन कोट्याधिश व्यक्तींच्या
दुःखार्त छब्या मी बघतो
कुणी कुठे असे हरलेले
कुणी कुठून हाकलेले
कुणी दुखापतीने जर्जर
कुणी कुठे धावतो सरसर
मग घडी घालताना मी
येतो पहिल्या पानावर
अन लक्ष काहिसे जाते
त्या मगाचच्या आकड्यांवर
हे इथे कितीसे गेले
ते तिथे कितीसे गेले
कुणी कैलासाला गेले,
अल्लाला प्यारे झाले....
मी पेपर वाचत असतो
अन आकडे मोजत असतो...