मी लिहितो कारण...

प्रसाद शिरगांवकर

मी लिहितो कारण,
मला वाटते जगण्या बद्दल
सुंदर काही...

मी लिहितो कारण,
शब्द एकटा दूर सारतो
लक्ष दिशांना अंधाराच्या
शापित वेशी

मी लिहितो कारण,
अस्तित्वाचा सूर कोवळा
हृदयामध्ये अंकुर घेतो
रोज नव्याने

मी लिहितो कारण
एकाकी आयुष्यामध्ये
माझ्यासंगे चालत येते
अलगद माझा हात धरोनी
माझे गाणे

मी लिहितो कारण
अनुभुतींच्या दर्पणातुनी
नित्य नव्याने हृदयावरती बिंब उमटते
या विश्वाचे...

मी लिहितो कारण,
.... कुठले कारण
कुणास सांगू....
काय साधण्यासाठी?

Average: 9.2 (12 votes)