माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी

प्रसाद शिरगांवकर

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी
इतर प्राण्यांच्या तूलनेत
विशेष शारिरिक क्षमता नसतानाही
त्यानं जमीन व्यापली, समुद्र ओलांडले
आकाशाला गवसण्या घातल्या
अवकाशातही झेप घेतली

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी
यंत्र तयार केली, वस्तू तयार केल्या
वहानं तयार केली, महामार्ग बांधले
आणि महा-महाकाय शहरंही उभारली

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी
स्वतःसाठी बांधला मनमुराद स्वर्ग
अन निसर्गाला लोटलं दूर
छोट्या छोट्या राखीव जागांमध्ये
अन इतर प्राण्यांना कोंडलं
फक्त त्या राखीव जंगलांमध्येच

माणूस तसा प्रचंड कर्तुत्ववान प्राणी
जमीन, हवा, पाणी सारं आपल्या कवेत घेतलं
आणि
चार अब्ज वर्षांचा निसर्गाचा समतोल
उध्वस्त केला, फक्त चारेकशे वर्षांमध्ये!

Average: 7 (1 vote)