प्रसाद शिरगांवकर

ओढणीचा शेव जेंव्हा खेचला हळुवार
ओंजळीने चेहरा तू झाकला हळुवार

पाहिले तेंव्हाच माझे भान जाताना
रेशमाने देह जेंव्हा स्पर्शला हळुवार

प्यासलेले ओठ तू ओठांत घेताना
अमृताचा कुंभ होता सांडला हळुवार

देत जे गेलीस ते मी घेत जाताना
पारिजाताचा सडा मी झेलला हळुवार

एवढ्याने का अशी कोमेजते राणी
गंध पुष्पांचा तुझ्या मी हुंगला हळुवार...

Average: 8.6 (29 votes)