दिशांची टाकळी

प्रसाद शिरगांवकर

जी तुझ्या पासुन नाही वेगळी
सावली गोर्‍या तनाची सावळी

काय मी देउ तुला आता सखे
अर्पितो माझ्या जिवाची पाकळी

रंगली आहे अता मैफील ही
पालवी गीतास आली कोवळी

आठवुनी आजही बेभान मी
त्या तुझ्या गालातली छोटी खळी

राहतो जेंव्हा तुझ्या स्पर्शाविना
राहते शून्या प्रमाणे पोकळी

एकदा माझेच होते रान हे
राहिली हातात आता झावळी

हे कधी कळलेच ना जावे कुठे
चालली होती दिशांची टाकळी

कारणे याचीच आता शोधतो
नेहमी माझाच का जातो बळी

या स्मशानाने पुन्हा नाकारले
राहिली जागा न येथे मोकळी

दाह सार्‍या जीवनाचे झेलुनी
जन्मली पुन्हा अता माझी कळी

Average: 7.5 (2 votes)