भास्कर तो गझलेचा...

प्रसाद शिरगांवकर

तेजाने तळपत होता भास्कर तो गझलेचा
शून्यात लोपला आता भास्कर तो गझलेचा

हातात घेतली होती त्याने मशाल चैतन्याची
आजन्म पेटला होता भास्कर तो गझलेचा

ज्या काव्याच्या शब्दांनी पेटली हजारो राने
त्या काव्याचा निर्माता भस्कर तो गझलेचा

आजन्म पेरली त्याने काव्यात मराठी माती
या मातीचा उद्गाता भास्कर तो गझलेचा

श्वासांची, भासांची आजन्म रेखुनी चित्रे
श्वासांत राहिला आता भास्कर तो गझलेचा

गझलसम्राट सुरेश भट यांना आदरपूर्वक समर्पित...।

Average: 9.7 (18 votes)