प्रसाद शिरगांवकर

त्यांच्या ऋतुंप्रमाणे जगणे मला न आले
ते सांगतील तेंव्हा फुलणे मला न आले

हा चेहराच माझा या आरशात आहे
भलत्याच चेहर्‍यांना बघणे मला न आले

त्यांच्या भल्या सुखांच्या या लांब लांब रांगा
रांगेत कोणत्याही बसणे मला न आले

मारावयास आले त्यांना दिली फुले मी
साधे धनुष्य हाती धरणे मला न आले

जे जे घडावयाचे ते ते घडून गेले
विझणे तुला न आले, जळणे मला न आले

आयुष्य संपताना याचीच खंत आहे
माझ्या मनाप्रमाणे मरणे मला न आले

Average: 8.5 (4 votes)