शब्द माझा अर्जुनाचा बाण आहे
केशवाच्या बासरीचा प्राण आहे
झोकतो आहे जरी प्याले विषाचे
काव्य माझे अमृताची खाण आहे
सोडुनी जाउ कुठे काव्यास आता
घेतलेले हे सतीचे वाण आहे
छेडतो मी सूर आकांताप्रमाणे
तानपुर्याचा असा मी ताण आहे
भेटण्यासाठी तुला माझ्या कविते
सोडले मी काय याची जाण आहे