माझी द्रुपलगिरी - ९

प्रसाद शिरगांवकर

स्वतःची द्रुपलची कंपनी चालवत असताना एक दिवस माझा शाळेतला मित्र दीपक पुरंदरेचा फोन आला. “अरे तू द्रुपलमध्ये काम करतोस ना? माझ्या एका क्लायंटच्या टिमला द्रुपल शिकायचं आहे. कोणी ट्रेनर माहित आहे का?” असं विचारलं. दीपक तेंव्हा सीड इन्फोटेकच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग डिपार्टमेंटला काम करायचा. त्यांच्या क्लायंट्ससाठी द्रुपलचं ट्रेनिंग देणारं कोणीच त्याला सापडत नव्हतं. मलाही असं कोणी माहित नव्हतं.

मग त्यानी विचारलं, “तू करशील का हे ट्रेनिंग?” ट्रेनिंग गोव्यामध्ये असणार होतं. यायचा, जायचा, रहायचा खर्च आणि वर ट्रेनिंगचं छानसं मानधनही मिळणार होतं! लगेच ‘हो’ म्हणून टाकलं!

कॉर्पोरेट ट्रेनिंग घेण्याचा हा माझा पहिलाच अनुभव! या आधी शिकवलं होतं, पण खूप वर्षांपूर्वी, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, तेही ठरलेल्या अभ्यासक्रमानुसार. इथे समोर शिकायला म्हणून येणारे हे इंजिनियर वगैरे, कामाचा अनुभव असलेले, मोठ्या कंपनीत जॉब लागल्याने “आपल्याला सगळंच येतं” असा समज असलेले. आणि कंपनीनी काहीतरी ट्रेनिंग घ्यायला सांगितलंय म्हणून समोर येऊन बसलेले! शिवाय द्रुपलचा ‘अभ्यासक्रम’ असा काही नव्हता तेंव्हा... तीन दिवसांत समोरच्या वीस जणांना द्रुपल काय आणि कसं शिकवायचं हा मोठा प्रश्न होता! ट्रेनिंगच्या एक दिवस आधी गोव्यात पोचलो आणि सात - आठ तास स्वतःला खोलीत बंद करून घेऊन तीन दिवसांचा ट्रेनिंग प्लॅन, त्यानुसारचे exercises, presentations वगैरे सगळं तयार केलं.

अर्थात, या प्रकाराला Curriculum Design म्हणतात हे तेंव्हा माहित नव्हतं आणि पुढे जाऊन मी त्यातच माझं आंतरराष्ट्रीय पातळीवर करीयर करीन याची पुसटशीही कल्पना नव्हती!

तर ते तीन दिवसांचं ट्रेनिंग फारच छान झालं! मग पुढे दीपक आणि सीड इन्फोटेक मधून कॉर्पोरेट ट्रेनिंगच्या अशा सुपाऱ्या मिळायला लागल्या! तेंव्हा स्वतःचा व्यवसाय सुरु होताच. दोन्ही मॅनेज करताना जरा धावपळ व्हायची... पण शिकवून मजा यायची म्हणून ते करत राहिलो.

पुढच्या वर्षाभराच्या काळात व्यवसायामध्ये एक मोठा फटका बसला आणि व्यवसाय बंद करायचा निर्णय घ्यावा लागला. चार-पाच वर्षं अत्यंत मेहनतीनं उभा केलेला व्यवसाय अक्षरशः दोनेक महिन्यांत गुंडाळावा लागला. प्रचंड तगमग झाली जिवाची. जिवाभावाची टीम विखुरली. कंप्युटर्स, फर्निचर वगैरे कवडीमोल किमतीला विकावं लागलं. एक एक करून जोडलेल्या शे-सव्वाशे क्लायंट्सना वाऱ्यावर सोडून द्यावं लागलं. “मी हरलो. पराभूत झालो. मला धंदा करणं जमलं नाही” याचं मोठं शल्य मनावर राहिलं.

या अवस्थेमध्ये असताना, आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न होता. पण तेंव्हा ड्रुपलनी आणि ट्रेनिंगनी साथ दिली... सीड कडून एकामागून एक ट्रेनिंगची कामं येतच राहिली आणि पुढची दोनेक वर्षं मी फक्त फ्री-लान्स कॉर्पोरेट ट्रेनिंग, तेही मुख्य करून ड्रुपलमध्ये, करत राहिलो. ते करताना, भारतभर हिंडायला मिळालं. पुणे, मुंबई, दिल्ली, कलकत्ता, बंगलोर, चेन्नई... सर्वच महानगरांमध्ये जाता आलं. शेकडो लोकांशी संवाद साधता आला. शिकवण्यासाठी नव्यानं शिकतही गेलो. शिकवणं, संवाद साधणं, अधिकाधिक चांगलं होत गेलं...

देशभर कॉर्पोरेट शिकवण्या घेत भटकंती सुरु असताना, ड्रुपलचा मूळ निर्माता 'ड्रीस बायटार्टच्या' ‘आक्विया' या कंपनीच्या भारतीय क्लायंट्सना ट्रेनिंग द्यायचं काम मिळालं होतं एकदा. आक्वियाची भारतात शाखा काढण्यासाठी आलेल्या जेकब सिंगशी मैत्री झाली. आणि जेकबनी आक्विया जॉईन करण्याची ऑफर दिली!

मी देशामध्ये करत असलेल्या ड्रुपलच्या ट्रेनिंगला आता आंतरराष्ट्रीय कॅनव्हास मिळाला! मी फ्रीलान्सर म्हणून फक्त देशामध्ये करत असलेली भटकंती पुढे परदेशांत करायला लागलो... आक्वियाच्या ग्लोबल क्लायंट्ससाठी ड्रुपलचे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स डिझाईन करणं आणि (काही वेळा) ते स्वतः कंडक्ट करणं हे काम करायला लागलो...

पुढच्या वर्षा दोन वर्षांत आक्वियाच्या क्लायंट्ससाठी चार-पाच देशांमधे वीस-पंचवीस ट्रेनिंग वर्कशॉप्स घेतले! धमाल आली...

हे करतानाच आक्वियासाठी ड्रुपलचा जगातला पहिला सर्टिफिकेशन प्रोग्रॅम डेव्हलप केला आणि तो प्रचंड यशस्वीही झाला... त्या विषयी पुढच्या भागामध्ये!

Average: 9.3 (3 votes)