माझी द्रुपलगिरी - ५

प्रसाद शिरगांवकर

मराठीमध्ये उत्तमोत्तम, दर्जेदार आणि अत्याधुनिक वेबसाईट्स तयार व्हायला पाहिजेत हे स्वप्न उराशी बाळगून अन त्या दुसरं कोणी करत नसेल तर आपणच केल्या पाहिजेत हे ध्येय मानून मी स्वतःच्या व्यवसायात उडी मारली. परदेशी कंपनीतला उबदार पगार आणि आरामदायी लाईफस्टाईल सोडून ही अशी उडी मारणं जरा रिस्कीच होतं. पण तरी मी केलं. स्वतःवर आणि द्रुपलवर विश्वास होता आणि बायकोची साथ.

द्रुपल वापरून काय वाट्टेल त्या प्रकारची आधुनिक मराठी वेबसाईट आपण करू शकू असं वाटत होतं. तेंव्हा द्रुपल फारसं माहित नव्हतं. येतही नव्हतं. तरी हा विश्वास होता..! नोकरी सोडली. एक Laptop विकत घेतला, ‘मराठी वेबसाईट्स डॉट कॉम’ नावाचं डोमेन घेतलं, थोडी व्हिजिटिंग कार्डं छापून घेतली आणि स्वतःच्या घरातून व्यवसाय सुरु केला..

पहिले काही दिवस नुसते बिझनेस प्लॅन्स करत बसलो. सगळ्या मित्रांना फोन किंवा ईमेल करून मी काय करतोय / करणारे ते सांगत बसलो. एक - दोन दिवसांतच एका मित्राचा फोन आला, त्याच्या ओळखीच्या कोणा फडके नावाच्या काकांना मराठीत वेबसाईट करायची आहे असं कळलं. त्यांना जाऊन भेटलो. आणि मला पहिला क्लायंट मिळाला! (त्यांच्याशी अजूनही माझे अत्यंत गाढ संबंध आहेत!)

पुढे खूप जुने मित्र मदत करत गेले. नवे मित्र जोडत गेलो. कामं मिळत राहिली. कामं करत गेलो. सगळी अर्थातच द्रुपलमध्ये.. आणि मराठीत..!

मग कामं करायला टीम असावी असं वाटलं आणि टीम साठी असावं म्हणून एक छोटं ऑफिस भाड्यानी घेतलं. टीम उभी करायला पुन्हा मित्रांना साद दिली. त्यांनीही प्रतिसाद दिला. अन पल्लवी, नीलम आणि श्वेता जॉईन झाल्या. तिघींनाही ‘द्रुपल' काय आहे हे माहित नव्हतं. मी शिकवलं. त्यांनी झटपट शिकून घेतलं.. आणि द्रुपलमध्ये काम करायला लागल्या.

अफलातून काळ होता तो. मी बाहेर जाऊन कामं आणायचो आणि या तीन चिमुकल्या वाघिणी त्या कामांचा फडशा पाडायच्या..

अर्थात चॅलेंजेसही भरपूर असायची. प्रत्येक प्रोजेक्टसाठी द्रुपलची नवी मोड्युल्स शोधायला लागायची. द्रुपलचा विस्तार नव्यानं शिकायला लागायचा. काही गोष्टी चालायच्या, काही बंद पडायच्या. बाकी इंटरनेट कनेक्शन बेभरवशाचं असणे, वीज तासनतास गायब होणे, नेटवर्कमध्ये व्हायरस येणे वगैरे समस्या तर असायच्याच.

येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सतत नव्यानं शिकत रहाण्याचा हा माझ्या द्रुपलगिरीतला महत्वाचा टप्पा!

व्यावसायिक/कमर्शियल सॉफ्टवेअर शिकवणारे कोर्सेस असतात. शिवाय त्यात काम करताना काही अडचण आली तर ज्याच्याकडून सॉफ्टवेअर विकत घेतलंय त्यांचा सपोर्टही घेता येतो. झालंच तर ‘हेल्प’ आणि डॉक्युमेंटेशनही चांगलं आणि भरीव असतं. ओपनसोर्समध्ये बहुसंख्यवेळा या सगळ्याचीच वानवा असते. आपल्याकडे फक्त ‘जॉब ग्यारंटी’ असलेले कोर्सेसच चालतात, त्यामुळे एखाद्या ओपनसोर्स सॉफ्टवेअरला बाजारात पुरेशी मागणी येत नाही तोवर त्याचे कोर्सेस तयार होत नाहीत. (मी काम सुरु केलं तेंव्हा द्रुपलचा भारतात एकही कोर्स नव्हता. पुढे जाऊन मी त्याचं ट्रेनिंग सुरु केलं. त्या विषयी पुढच्या एखाद्या भागात..). तसंच हे कोण्या एका ‘कंपनीनं’ तयार केलेलं सॉफ्टवेअर नसतं आणि ते आपण विकतही घेतलेलं नसतं त्यामुळे हक्कानं कोणाकडे सपोर्टही मागता येत नाही. आणि बहुसंख्य ओपनसोर्स सॉफ्टवेअरच्या डॉक्युमेंटेशनचा आनंदी आनंदच असतो.

त्यामुळे ओपन सोर्स सॉफ्टवेअर शिकण्यासाठी आपण स्वतः बाह्या सरसावून, चिकाटीनं बसून आणि वेगवेगळे प्रयोग, trial and error करून बघावं लागतं. हे करताना तासन-तास, दिवसेनदिवस मेहनत करून एखादा छोटासा प्रश्न कधी सुटत नाही. तर एखाद्या भल्या मोठ्या समस्येचं उत्तर कधी चुटकीसरशी मिळतं. पण हे सगळं पोषाखी पद्धतीनं उंटावरून शेळ्या हाकून होत नाही. तर आपण स्वतः चिखलात उतरून आपले हात बरबटवूनच करता येतं.

असेच आम्ही. आम्ही म्हणजे मी आणि आता माझी टीम. स्वतः आखाड्यात उतरून, द्रुपल शिकून घेत घेत मराठीत बेवसाईट्स करायला लागलो. फार म्हणजे फार धमाल आली आम्हाला तेंव्हा.

त्याचं पुढे काय झालं? ते पुढच्या भागात!

Average: 9 (2 votes)