माझी द्रुपलगिरी - ७

प्रसाद शिरगांवकर

त्या काळात शुद्ध मराठी वेबसाईट तयार करण्यात फार कोणाला रस नसायचा. "वेबसाईट इंग्रजीतच पाहिजे” असाच बहुसंख्य लोकांचा हट्ट असायचा. मग मी कोणाला कोणाला मराठीतच वेबसाईट करणं गरजेचं असेल यांची यादी केली. सुरुवात मराठी दिवाळी अंक आणि प्रकाशकांपासून केली. त्यांच्यासाठी काही पॅकेजेस तयार केली. पत्रं पाठवली. ओळखी काढून भेटलो. पण त्यात फार काही यश मिळालं नाही. जी काही थोडीफार कामं मिळाली ती अगदीच तुटपुंज्या मोबदल्याची किंवा थॅंक्यू बेसिसची मिळाली!

तेंव्हा लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होत्या. (२०१४ च्या नाही. त्या आधीच्या!) एक दोन राजकारण्यांच्या मराठी वेबसाईट्स करायची प्रोजेक्ट्स मिळाली (त्याचे पैसेही मिळाले!) आणि आम्ही जरा तग धरू शकलो...

पण एकुणात, फक्त मराठीत काम करून आम्हाला फारसे पैसे मिळत नव्हते.. मग आम्ही इतर भाषांतही काम करायचं ठरवलं.

मग माझ्या टीमचं द्रुपल मधलं स्किल लक्षात घेऊन मी ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि एक आगळी वेगळी ऑनलाईन सर्विस लॉंच केली. आईडिया एकदम साधी होती. द्रुपलच्या वेबसाईटचं डिझाईन (थीम) ही त्याच्या प्रोग्रॅमिंग code पेक्षा वेगळी असते. ती बनवणाऱ्या लोकांचा जगात बऱ्यापैकी तुटवडा असतो (तेंव्हा असायचा) आणि आमच्या टीमला ते काम उत्कृष्टपणे करता यायचं. म्हणून आम्ही designs2drupal नावाची सर्विस लॉंच केली. तुम्ही तुम्हाला हवं ते graphic design द्या, त्या designचं द्रुपलच्या थीममध्ये आम्ही रुपांतर करून देऊ अशी सर्विस होती. वर तीन दिवसांत आम्ही बेसिक थीम करून देऊ, ती आवडली तरच पैसे (आणि पुढचं काम) द्या अशी आमची ऑफर होती.

नवी सर्विस लॉंच केल्यावर अक्षरशः आठवड्याच्या आत आम्हाला पहिला परदेशी (जर्मन) क्लायंट मिळाला.! छोटासा प्रोजेक्ट होता, तीन-चार दिवसांचा. तो आम्ही छान करून दिला. त्यानी आमच्या बद्दल एक ब्लॉगपोस्ट लिहिली आणि ट्वीट केलं. आणि मग युरोपमधून कामं मिळायला लागली. पुढच्या पंधराच दिवसांत पहिला अमेरिकन क्लायंटही मिळाला. त्यांनी छोटे छोटे पाच सहा प्रोजेक्ट एकामागून एक दिले. आणि मग एक एकदम मोठ्ठा प्रोजेक्ट दिला.

आता टिम वाढवणं आणि मोठं ऑफिस घेणं दोन्ही गरजेचं बनलं. मग मोठी उडी मारून तेही केलं.

पुढच्या सहाच महिन्यांत दीडेक हजार स्क्वेअरफूटचं ऑफिस आणि पंधरा लोकांची टीम झाली. अमेरिका-युरोप मधले प्रोजेक्टही सुरु होते आणि भारतातलेही.

पुढच्या तीन वर्षांच्या काळात आम्ही १२ देशांमधल्या क्लायंट्ससाठी, ८ भाषांमधले, साधारण २५० प्रोजेक्ट्स केले!!

फक्त द्रुपलमध्ये काम करायचं एवढा एकच फोकस होता. आणि तो शेवटपर्यंत ठेवला.

हो शेवटपर्यंत. पण शेवटाविषयी नंतर कधीतरी.

Average: 9 (2 votes)