माझी द्रुपलगिरी - ६

प्रसाद शिरगांवकर

मराठी वेबसाईट्स डॉट कॉमच्या बॅनरखाली आम्ही बऱ्यापैकी काम करू शकलो. ‘आम्ही’ अशासाठी की आता मी एकटा नव्हतो, टीम होती. आणि जे काम केलं, हातून घडलं ते मी एकट्यानी केलं नाही तर संपूर्ण टीमनं केलं. तीन-चार वर्षांच्या काळात आम्ही पन्नास-साठ मराठी वेबसाईट्स केल्या. वधुवर सूचक मंडळांपासून ते प्रकाशकांपर्यंत, साहित्य संस्थांपासून ते लेखकांच्या व्यक्तिगत साईट्स पर्यंत. सेवाभावी संस्था, वाचनालयं, मासिकं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी वेबसाईट्स तयार केल्या आम्ही.

काही अफलातून प्रोजेक्ट्सवर काम करायची संधी मिळाली. प्रबोधनकार ठाकरेंचं समग्र साहित्य एका ठिकाणी प्रकाशित करणारी prabodhankar.org, ३५ पारिभाषिक कोषांमधल्या दोनेक लाख शब्दांचा अनुवाद देणारी marathibhasha.org, पुण्याच्या साहित्य संमेलनाची तेंव्हाची वेबसाईट. अशा काही मोजक्या उल्लेखनीय वेबसईट्स..

मराठीमध्ये वेबसाईट्स बनवणारा माणूस (किंवा कंपनी) म्हणून तेंव्हा प्रसिद्धीही बऱ्यापैकी मिळाली. आमच्या वेगवेगळ्या मराठी वेब-प्रोजेक्ट्स बाबत वर्षा-दोनवर्षांत ४०-५० लेख-बातम्या आल्या वर्तमानपत्रांमध्ये. काहीवेळा मराठी न्यूज चॅनल्सवर कव्हरेजही आलं.

पण काम करताना मिळणारं समाधान आणि केल्यावर मिळणारी प्रसिद्धी या दोनच गोष्टी व्यवसाय चालवण्यासाठी पुरेशा नसतात हे अत्यंत महत्वाचं तत्व तेंव्हा लक्षात आलं.

व्यवसाय चालवण्यासाठी पैसे लागतात. तो करण्यासाठी पैसे गुंतवायला लागतात आणि गुंतवलेल्या पैशांचा पुरेसा (खरंतर मुबलक) परतावा आला तरच तो व्यवसाय टिकू शकतो.

मराठी वेबसाईट्स तयार करण्याच्या व्यवसायात 'गुंतवलेल्या कष्टांचा आणि पैशांचा पुरेसा मोबदला’ हे सोडून, बाकी सगळं लै ब्येष्ट घडत होतं.!

अगदी साधं, सरधोपट उदाहरण द्यायचं तर, जे काम एखाद्या अमेरिकन क्लायंटसाठी केलं तर समजा दोन लाख रुपये मिळतील, किंवा भारतातल्या क्लायंटच्या ‘कमर्शियल इंग्लिश वेबसाईट’साठी केलं तर पन्नास-साठ हजार मिळतील तेच काम एखाद्या मराठी वेबसाईटसाठी केलं तर दहा-वीस हजार रुपये मिळायचे. तेही दहा-वीस चकरा मारल्या नंतर.

“लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.” किंवा “माझा मराठाची बोलू कवतुके...” वगैरे फक्त पेज थ्री पार्टीत किंवा सोशल मीडियावर स्टेटस म्हणून मारायच्या गप्पा असतात हे तेंव्हा लक्षात आलं. मराठी तंत्रज्ञानात गुंतवणुक करायची वेळ येते तेंव्हा अशा गप्पा मारणाऱ्या भल्या भल्यांना धाप लागते हेही प्रत्यक्ष अनुभवलं.

अर्थात, आज, या घडीला, माझी कोणाहीविषयीही काहीही तक्रार नाही. मातृभाषेवरचं प्रेम, तिचा जाज्वल्य अभिमान, ती टिकावी आणि पुढे जावी यासाठी असलेली तळमळ या साऱ्यापेक्षा व्यवहार आणि पैसा मोठा असतो हे मी अनुभवलंही आहे आणि मला मान्यही झालं आहे. मराठी वेबसाईट हे व्यवसाय किंवा व्यवहार म्हणून नाही तर हौस किंवा अभिमान म्हणून करायच्या असतात हा बहुसंख्य मराठी बेवसाईट निर्मात्यांचा विचार मी भोगला आणि अनुभवला आहे. आणि त्यांचा हा विचार मला अंशतः मान्यही आहे...

(ज्यांना हे मान्य नाही त्यांनी मराठीत तंत्रज्ञान निर्माण होण्यासाठी स्वतःच्या कमाईचे लाखो रुपयो गुंतवावेत. मी त्या प्रोजेक्टमध्ये आनंदानं सहभागी होईन)

या सर्व परिस्थितीत आमच्या द्रुपलवर आधारित मराठी वेबसाईट्स डॉट कॉमचं पुढे काय झालं? आमचा द्रुपलचा प्रवास पुढे कोणत्या दिशेनी गेला?

या विषयी पुढच्या भागात.

Average: 9 (2 votes)