माझी द्रुपलगिरी - १०

प्रसाद शिरगांवकर

आक्विया जॉईन करताना जेकबनी विचारलं, ‘आम्हाला ड्रुपलचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम तयार करायचा आहे. तुला त्यात काम करायला आवडेल का?’ मी लगेच ‘हो’ म्हणून टाकलं!

सर्टिफिकेशन म्हणजे एकाद्या विषयातलं एखाद्या माणसाला किती ज्ञान आहे हे परीक्षा घेऊन तपासणं आणि तसं त्याला सर्टिफिकिट देणं. या सर्टिफिकिटच्या आधारावर त्या माणसाला नोकरी वगैरे मिळू शकते म्हणून हे त्याच्यासाठी खूप महत्वाचं असतं. पण सर्टिफाइड असलेल्या माणसाकडे खरोखरच काही विशेष ज्ञान आहे याची शाश्वती नोकरी देणाऱ्या कंपनीला मिळणं गरजेचं असतं. तसं झालं तर त्या सर्टिफिकेशनला प्रतिष्ठा मिळते... म्हणून सर्टिफिकेशनसाठीच्या परीक्षा या काळजीपूर्वक तयार करणं आणि त्या ठराविक पातळीच्या आणि तोलामोलाच्या असणं गरजेचं असतं. त्यामुळे असे सर्टिफिकेशन प्रॉग्रॅम तयार करणं आणि चालवणं यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते आणि खूप गुंतवणुकही करावी लागते.

मायक्रोसॉफ्ट, ओरॅकल वगैरे कमर्शियल सॉफ्टवेअर कंपन्यांना अशी गुंतवणुक परवडत असल्याने त्यांची स्वतःच्या सॉफ्टवेअर बाबतची सर्टिफिकेशन्स असतात. पण ड्रुपलसारख्या मुक्तस्रोत सॉफ्टवेअरमध्ये मात्र गुंतवणुक कोणी करायची असा प्रश्न असतो, म्हणून अशी सर्टिफिकेशन्स नसतात. (आधी Redhat आणि आता Acquia हे याला सन्माननीय अपवाद)

तर आक्वियानी ड्रुपलचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम तयार करायचं ठरवलं होतं, तेंव्हाच मी जॉईन झालो होतो आणि मला त्यात येशील का असं विचारलं. मी उत्साहानं हो म्हणालो होतो पण मला सॉफ्टवेअरच्या परीक्षा तयार कशा करायच्या आणि त्याचा ग्लोबल प्रोग्रॅम कसा चालवायचा या बद्दल शष्प काही माहित नव्हतं! पण "आपल्याला काहीही जमू शकतं” या पुणेरी आत्मविश्वासामुळे मी काम करायला लागलो!

मी पहिल्या एक-दोन परीक्षांसाठी काही प्रश्न लिहिले. ते लोकांना पाठवले. ते सगळे त्यांनी हाणून पाडले! तेंव्हाच पीटर मॅनिजॅक नावाचा एक अमेरिकन प्रेमळ म्हातारा या प्रॉग्रॅमचा लीड म्हणून अमेरिकेच्या ऑफिसमध्ये जॉईन झाला. तो अमेरिकेत, मी भारतात. रोज स्काईपवर कॉल करून आम्ही काम करायला लागलो. त्याला ड्रुपलबद्दल काहीही माहित नव्हतं आणि मला सर्टिफिकेशन बद्दल. त्याची भाषा मला कळायची नाही आणि माझी भाषा त्याला. शिवाय सुरुवातीला आमचे काम करायच्या पद्धतीवरूनही खटके उडाले. पण तरी आम्ही बोलत राहिलो. हळूहळू एकमेकांचे मित्र होत राहिलो. (पुढे इतके मित्र झालो की तो आणि माझा मुलगा शौनकही एकमेकांना इमेल वगैरे करायचे आणि भेटवस्तू पाठवायचे!)

तर पीटरला सर्टिफिकेशन इंडस्ट्रीचा जबरदस्त अनुभव होता. मी त्याच्याकडून शिकत गेलो. तो अनुभव ड्रुपलसाठी कसा वापरता येईल हे बघत गेलो आणि त्याच्या बरोबर काम करून आम्ही ड्रुपलचा पहिला सर्टिफिकेश प्रोग्रॅम लॉंचही केला! पुढे आठ-दहा महिन्यांत पीटरचं आणि कंपनीच्या मॅनेजमेंटचं काहीतरी बिनसलं आणि पीटर काम सोडून निघून गेला. तो गेल्यावर कंपनीनी मला विचारलं की, हा प्रोग्रॅम आता तू चालवशील का?

आणि पुन्हा एकदा"आपल्याला काहीही जमू शकतं” हा पुणेरी आत्मविश्वास मदतीला आला. मी ‘हो’ म्हणालो! एका हुषार मिस्त्री सारखं पीटरनी मला ‘मापं कशी घ्यायची आणि रंधा कसा मारायचा’ हे शिकवलं होतं पण 'खिळे कसे मारायचे आणि पॉलिश कसं करायचं’ हे लपवून ठेवलं होतं! मी प्रोग्रॅम मॅनेज करायला लागल्यावर ते लक्षात आलं. मग तेही शिकून घेतलं...

तर सध्या मी आक्वियानी निर्माण केलेला ड्रुपलसाठीचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम मॅनेज करतो. दोन वर्षांत त्यासाठी आठ नव्या परीक्षा तयार करून घेतल्या आणि त्या जगभर वितरित केल्या. जगभरातल्या पन्नासेक देशांमधल्या हजारो लोकांनी या प्रोग्रॅममध्ये सहभाग नोंदवला आहे! भारत, युरोप आणि आमेरिकेमध्ये या प्रोग्रॅमसाठी मी प्रचंड प्रवासही केला आहे, करतो आहे!

"आपल्या स्वतःच्या कविता ऑनलाईन असाव्या” या साध्या हेतूनं दहा-बारा वर्षांपूर्वी सुरु झालेला माझ्या ड्रुपलगिरीचा प्रवास. हा प्रवास आता पन्नासेक देशांमधल्या पाच-सात हजार लोकांच्या ड्रुपलगिरीची चाचणी घेऊन त्यांना सर्टिफिकिटं देण्यापर्यंत येऊन पोचला आहे!! हा आता त्यांच्या ड्रुपलगिरीला आणि त्यांच्या करियर्स आणि आयुष्यालाही उभारी मिळण्यासाठी खारीचा वाटा देतो आहे.

हे सगळं घडत असलेलं बघून खूप छान वाटतंय खरं. पण यातलं काहीच मी प्लॅन केलं नव्हतं. यातलं काहीच घडण्यासाठी अट्टाहास केला नव्हता. खरंतर जे प्लॅन केलं, जे घडावं म्हणून तगमग केली, ज्याचा अट्टाहास केला ते सपशेल फसलं. आणि जे सहजच, गंमत म्हणून, मनापासून आवडतंय म्हणून करत गेलो ते मोठं होत गेलं. त्याला यश मिळत गेलं.

म्हणून मी माझ्या ड्रुपलगिरीचा पुढचा टप्पा काय असेल, पुढचा प्रवास कसा असेल हे आता प्लॅन करत नाही! जे सहज करावंसं वाटेल आणि जे करताना मनापासून मजा येईल ते करत रहायचं एवढाच प्लॅन आहे.

आणि हा प्लॅन नक्कीच यशस्वी होतो.!!

Average: 9.5 (4 votes)