माझी द्रुपलगिरी - २

प्रसाद शिरगांवकर

मी कॉमर्स साईडचा माणूस. तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, प्रोग्रॅमिंगचा माझ्या शिक्षणाशी दूर दूरचाही संबंध नाही! कॉलेज संपताना B. Com आणि ICWA एकाच वेळी पूर्ण केलं आणि एका मोठ्या फार्मा कंपनीच्या कॉस्टिंग डिपार्टमेंटमध्ये खर्डेघाशी करायची नोकरी धरली. ती खर्डेघाशी करताना कॉम्प्युटर माझ्या आयुष्यात आला. कंपनीतल्या जुन्या धेंडांना कॉम्पयुटर आवडायचे नाहीत, त्यावरचं काही काम जमायचंही नाही. मी वीस वर्षांचा उमेदीचा वगैरे तरुण होतो, आपलं आपण नवीन काम शिकून घ्यायचो. त्यामुळे कॉम्प्युटरसंबंधी सगळी कामं माझ्यावर पडायची. मीही challenge म्हणून घ्यायचो आणि उत्साहानी करायचो. त्यावेळी Excel नवं नवं आलं होतं. ते मी काम करत करत शिकून घेतलं. आख्ख्या डिपार्टमेंटमध्ये ते फक्त मलाच यायचं. खूप शायनिंग मारायचो तेंव्हा मी!! (शायनिंग मारणाऱ्या माणसाच्या अंगावर खूप काम पडतं हे नंतर समजलं. पण ते असो!)

कॉम्प्युटरशी ओळख झाल्यावर, दहावीला चांगले मार्क पडलेले असतानाही मी सायन्सला जाऊन पुढे कम्प्युटर इंजिनियरींगला गेलो नाही, याची पहिल्यांदा हळहळ जाणवली. पण पुढे कॉम्प्युटरमध्येच काम करायच्या संधी शोधत गेलो. सापडत गेल्या आणि त्यात कामही करायला लागलो. पण ते काम बरंचसं Analyst किंवा Functional Consultant या सारखं होतं. ज्यात स्वतः programing करायला लागायचं नाही पण software कसं असावं, त्यानं काय काम करावं याची कल्पना मांडणारं काम होतं ते.

सगळं सांगायचा उद्देश असा की जेंव्हा स्वतःची वेबसाईट करायला घेतली तेंव्हा प्रोग्रॅमिंग मधला ‘प्र’ही मला माहित नव्हता! आणि ती साईट (तेंव्हाचं) अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन मराठीत करायची होती (जे तेंव्हा अफाट कठीण होतं!)..

इथे द्रुपलनी मला पहिला मदतीचा हात दिला. द्रुपल ही एक Content Management System (CMS) आहे. CMS चा हेतूच असा असतो की तुम्हाला प्रोग्रॅमिंगची एक ओळही न लिहिता अत्याधुनिक वेबसाईट बनवता येते! अर्थात ती CMS इन्टॉल कशी करायची आणि कॉन्फिगर कशी करायची या ‘टेक्निकल’ गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात. पण त्याला जरा धडपड करावी लागते, प्रॉग्रॅमिंग नाही! मीही लागेल ती धडपड केली. इकडून तिकडून गोष्टी वाचून शिकलो आणि द्रुपल माझ्याकडे इन्स्टॉल केलं. त्यात मराठी साहित्य प्रकाशित करण्याची सोय केली. आपलं सगळं लिखाण त्यात टाकलं आणि स्वतःची १००% डायनॅमिक आणि शुद्ध मराठी वेबसाईट तयार केली!

स्वतःच्या कंप्युटरवर तयार केलेली साईट जगासमोर प्रकाशित कशी करायची हे पुढचं चॅलेंज समोर आलं! मग सर्वर म्हणजे काय, होस्टिंग म्हणजे काय, डोमेन नेम म्हणजे काय वगैरे गोष्टी शोधायला लागलो.

आवश्यक ती माहिती मिळवून, लागतील ते जुगाड करून स्वतःची पहिली १००% मराठी अत्याधुनिक साईट २००६ साली प्रकाशित केली. साईटचं नाव त्यातल्या अत्याधुनिक, bleeding edge वगैरे तंत्रज्ञानाला अनुरुप न ठेवता, त्यात मांडलेल्या विचारांना अनुरुप असं ठेवलं. साईटचं नाव ठेवलं “साधं सोपं डॉट कॉम."

साधं सोपं डॉट कॉम हा माझ्या द्रुपलगिरीचा पहिला मैलाचा दगड. किंवा मी त्यानंतर तयार केलेल्या, करवून घेतलेल्या शेकडो वेबसाईट्स मधला मानाचा पहिला गणपती!!

गेल्या दहा वर्षांत साधं-सोपं चं रूप दोन-तीनदा बदललं. त्यातलं साहित्य अनेकदा बदललं. त्यात जमतील त्या नव्या नव्या सुविधा वाढवत गेलो. सगळं सगळं केवळ द्रुपलमुळे जमलं.

स्वतःचं साहित्य ऑनलाईन प्रकाशित करावं ही हौस आणि ते आपणच आधुनिक तंत्रज्ञान वापरुन करावं ही खाज या दोन्हीपोटी साधं सोपं डॉट कॉम तयार केली. पण त्यातून माझ्या करीयरला एक विलक्षण कलाटणी मिळाली. किंवा मी ती ओढवून घेतली...

त्या विषयी पुढच्या एखाद्या भागात.

Average: 8 (1 vote)