माझी द्रुपलगिरी - ४

प्रसाद शिरगांवकर

युनी-सरस्वती हा मी लिहिलेला फक्त एक Javascript चा code होता. जेमतेम एक पानी code. माझ्या द्रुपलच्या साईटवर मी काहीतरी जुगाड करून जोडला होता (द्रुपलमध्ये development कशी करायची हे शिकलो नव्हतो तेंव्हा). तो प्रकाशित केल्यावर काही दिवसांनी माझा मायबोली / मनोगत वरचा एक कवी आणि तंत्रज्ञ मित्र @tushar joshi ची एक मेल आली. तो म्हणाला, तुझ्या code वर आधारित एक द्रुपलचं मोड्युल मी develop केलंय आणि ते द्रुपलला contribute ही केलंय. बघ कसं झालंय ते. मी बघितलं. अफलातून काम केलं होतं तुषारनी. जसं कुठल्याही मिसाईलचा मिसाईल लॉंचर शिवाय काही उपयोग नसतो तसं नुसत्या Javascript code चा द्रुपलच्या module शिवाय काही उपयोग नसतो. त्या code वर आधारित मोड्युल तयार केल्यामुळे तो इतर शेकडो द्रुपल साइट्सना तो code सहज वापरता आला. पुढे तुषार नंतर इतरही तीन-चार contributors नी त्या मोड्युलमध्ये सुधारणा करत करत ते maintain केलं.

एकमेकांना कधीही न भेटलेली, एकमेकांशी काहीही संबंध नसलेली आणि काही पैशांचा व्यवहार आणि देणंघेणं नसलेली माणसं एकत्र येऊन collaboratively काम कसं करतात याचा विलक्षण अनुभव या घटनेतून आला. फक्त युनी-सरस्वती मोड्यूलच नाही तर आख्खं द्रुपल आणि बाकीही सर्वच open source softwares ही अशीच बनली आहेत.

एक कोणीतरी माणूस कंप्युटिंगमधला एखादा कुठलासा प्रॉब्लेम आपल्या पद्धतीनी सोडवतो. मग आपल्याला सापडलेलं उत्तर स्वतःपुरतं न ठेवता किंवा लायसन्स फी घेऊन न विकता ते जगासमोर प्रसिद्ध करतो. मग त्या प्रश्नावर काम करणारे इतर लोक ते उत्तर घेउन त्यात सुधारणा करत रहातात आणि त्या प्रकाशित करत रहातात. मग ते कोणा एकाचं सॉफ्टवेअर न रहाता संपूर्ण समुदायासाठी, संपूर्ण मानवजातीसाठीचं सॉफ्टवेअर बनतं.

कोणतंही software म्हणजे फक्त code हा खूप जणांचा एक फार मोठा गैरसमज आहे. Software म्हणजे फक्त code नसतं. ते ‘का तयार करायला पाहिजे' याचं analysis, 'कसं असायला पाहिजे' हे design, ‘कसं, कोणी आणि कधी develop केलं पाहिजे' हे planning आणि project management, शिवाय ते तयार झालं की त्याचं testing, 'कसं वापरायचं' यासाठीचं training आणि documentation असे खूप वेगवेगळे पैलू असतात software development चे.

व्यावसायिक software कंपन्या या सगळ्यांसाठी पगारी माणसं ठेवू शकतात, ठेवतात. Open Source Software साठी मात्र या सगळ्याच क्षेत्रांत कार्यकर्ते (volunteers) लागतात!

मी लिहिलेला युनीसरस्वतीचा Javascript code आणि पुढे जाऊन अजून लिहिलेली एकदोन मोड्यूल्स, एकदोन थीम्स वगैरे द्रुपलच्या महासागरात मी टाकलेले केवळ दोन तीन चमचे पाणी! जगभरातल्या दीडशे देशांतल्या तीसचाळीस हजार लोकांनी बादल्या आणि टॅंकरभरून पाणी टाकल्याने हा महासागर तयार झाला.

हा एक जगन्नाथाचा रथ आहे. कोणी एक माणूस तो वाहू शकत नाही. वेगवेगळ्या गावा-शहरा-देशांतली, वेगवेगळ्या वर्ण-वंश-धर्म-लिंगांची, वेगवेगळ्या भाषा बोलणारी माणसं आपापल्यापरीनं हातभार लावत रहातात आणि एकमेकांना कधीही न भेटता हा जगन्नाथाचा रथ पुढे पुढे नेत रहातात.

“ॐ सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सहवीर्यम् करवावहै” चा हा आधुनिक जगातला आविष्कार.

Average: 9 (2 votes)