माझी द्रुपलगिरी - ८

प्रसाद शिरगांवकर

द्रुपलवर आधारित असा स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतर पुढच्या दोनचार महिन्यांतच पुण्यात द्रुपल कॅंप होता. द्रुपल कॅंप म्हणजे द्रुपलमध्ये काम करणाऱ्या त्या त्या शहरातल्या लोकांचं एक स्नेहसंमेलन. हा प्रकार तसा नवाच होता मला. आणि तो पुण्यातही नवा होता. पुण्याचा पहिलाच द्रुपल कॅंप होता तो. मी त्यासाठी माझं सेशन प्रपोजल दिलं. (म्हणजे मला इथे बोलायची इच्छा आहे असं सांगितलं) आणि ते स्वीकारलं गेलं.

पुण्याच्या त्या पहिल्या वहिल्या द्रुपल कॅंपमध्ये मी वक्ता म्हणून गेलो! अर्थातच माझा विषय ‘मराठीत वेबसाईट कशी करायची?’ हा होता! चाळीस-पन्नास लोकंच होती त्या कॅंपला. पण त्यांनी भक्तिभावानी ऐकलं माझं व्याख्यान!

तेंव्हा पुण्यात द्रुपलमध्ये काम करणाऱ्या दोन किंवा तीन कंपन्या होत्या फक्त. आमचे काही टीम मेंबर्स आणि काही विद्यार्थी एवढेच उपस्थित होते कॅंपला. पण एकुणात धमाल आली होती.

पुढच्या काही वर्षांत भारतातली द्रुपलची कम्युनिटी वाढत गेली. मुंबई, बंगलोर, दिल्ली मध्येही द्रुपल कॅंप्स व्हायला लागले. मला जसं जमलं तसं मी सगळीकडे गेलो. ट्रेनिंग प्रोग्रॅम्स घेतले, व्याख्यानं दिली. भारतभरातल्या द्रुपलमध्ये काम करणाऱ्या खूप खूप लोकांशी जोडला गेलो.

पुढे जागतिक पातळीवर होणाऱ्या द्रुपल कॉन्फरन्सेसला जायचा योग आला. युरोप आणि अमेरिकेल्या द्रुपलकॉन्स ना गेलो. आणि जगभरातल्या असंख्य द्रुपलर्सशी जोडला गेलो.

पुण्या-मुंबईपासून ते न्यू ऑर्लियान्स-डब्लीन पर्यंत अनेक शहरांमध्ये भेटलेल्या देशोदेशींच्या द्रुपलर्समध्ये एक समान धागा दिसला.. ओपन सोर्स आणि त्यातही द्रुपल वापरून जगात बदल घडवून आणुया हे वेडं स्वप्न दिसलं या प्रत्येक माणसाच्या नजरेत!

मग कधीतरी लक्षात आलं की द्रुपल हे फक्त एक ओपनसोर्स सॉफ्टवेअर नाहीये तर ही कम्युनिटी आहे. जग बदलावं म्हणून प्रयत्न करणाऱ्या वेड्या लोकांची कम्युनिटी. अन मी या कम्युनिटीचा अविभाज्य भाग बनलो आहे..!

Average: 9 (2 votes)