माझी द्रुपलगिरी - ३

प्रसाद शिरगांवकर

तर माझी पहिली मराठी वेबसाईट साधं-सोपं डॉट कॉम मी द्रुपलमध्ये तयार करून लॉंच केली. एकाच लेखक / कवीचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी प्रकाशित असलेली ती मराठीतली कदाचित पहिली वेबसाईट.

साधं सोपं डॉट कॉमवरच्या कविता / लेखांवर वाचकांना कमेंट्स करायची सोय दिली होती. ती ही त्यांना इंग्रजी कीबोर्ड वापरून उच्चारानुसार मराठीत टाइप करता यावं अशी. या सोयीसाठी तेंव्हाच्या एका प्रसिद्ध मराठी वेबसाईटवरचा मराठी टायपिंग करताचा JavaScript चा code मी घेतला होता. त्या code साठी त्या साईटचे जाहीर आभारही मानले होते.

मात्र साधं सोपं प्रकाशित झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्या वेबसाईटच्या प्रशासकांनी “आमचा मराठी टायपिंगचा कोड वापरू नका” अशी जाहीर सूचना केली. मी म्हणालो “अहो करू द्या की लोकांना मराठीत टायपिंग. एवढं काय त्यात.” तर त्यावर उत्तर आलं की “हा आम्ही विकसित केलेला code आहे, तो तुझ्या साईटवर वापरायचा नाही.”

मी “ठीके” म्हणालो. त्यांचा मराठी टायपिंगचा कोड माझ्या साईटवरून काढून टाकला. मग पुढे तीन-चार दिवस अहोरात्र बसून त्या code साठी लागणारी Javascript नावाची भाषा शिकून घेतली. आणि मग लोकांना Phonetically (उच्चारानुसार) मराठी टाईप करता यावं यासाठी स्वतःच एक program लिहिला.

त्या प्रोग्रॅमिंगमधून तयार झालेला code साधं सोपंवर टाकला. शिवाय त्या code ला ‘युनी-सरस्वती’ असं नाव दिलं आणि तो code इतर लोकांनाही फुकट उपलब्ध करून दिला. (पुढे गूगलचं देवनागरी टायपिंग यायच्या आधी पर्यंत युनिसरस्वतीचा code शेकडो मराठी वेबसाईट्सवर वापरला गेला होता!)

तसंच, द्रुपल वापरून मराठीमध्ये वेबसाईट केल्यावर, ती माहिती स्वतःपुरतीच मर्यादित न ठेवता, मी ‘How to create a Marathi/Hindi website using Drupal’ या विषयी एक लेख द्रुपलच्या वेबसाईटवर लिहिला.. तो लेख पुढे हजारो मराठी/हिंदी/नेपाळी भाषिकांनी वाचला आणि आपल्या देवनागरी लिपीतल्या द्रुपल वेबसाइटस तयार केल्या.

त्या पुढे भारतात पुणे, मुंबई, दिल्ली मध्ये वगैरे भरणाऱ्या द्रुपल कॅम्प्समध्ये भारतीय भाषांमध्ये वेबसाईट कशी तयार करायची याची व्याख्यानं आणि प्रात्यक्षिकंही करत राहिलो. (अजूनही जमेल तेंव्हा करत रहातो)

द्रुपल हे मुक्तस्रोत (Open Source) तंत्रज्ञान आहे. ते जगभरातल्या हजारो लोकांनी एकत्र येऊन तयार केलं आहे. ते जगातल्या कोणालाही मोफत डाऊनलोड करून मोफत वापरता येतं.

जर मी जगभरातल्या हजारोंकडून काही घेतो आहे तर मी जगभरातल्या हजारोंना कही दिलंही पाहिजे हे साधं पण अत्यंत प्रभावी मूल्य द्रुपलनी मला शिकवलं..

मी लिहिलेला ‘युनिसरस्वती' हा कोड असो किंवा मराठी/हिंदीत साईट कशा कराव्यात या संबंधीचे लेख, व्याख्यानं वगैरे.. आपण समाजाकडून जे घेतो आहोत तितकं किंवा त्याहून जास्त आपण दिलंही पाहिजे हे मुक्तस्रोत चळवळीचा एक सामान्य वारकरी म्हणून शिकलेलं तत्व.

हे तत्व गेली दहा-बारा वर्षं माझ्या आयुष्याचं मार्गदर्शक तत्व बनलं आहे..

माझ्या द्रुपलगिरीतला हा अत्यंत महत्वाचा मैलाचा दगड.!

Average: 9 (2 votes)