दहा का बारा वर्षांपूर्वीची गोष्ट
तर त्याचं असं झालं की, आपलं सगळं बहुमोल वगैरे लिखाण एक सॉफ्टवेअर करून आर्काइव करून ठेवलं पाहिजे असं मला वाटलं. आपलं लिखाण आपल्याला हवं तेंव्हा हवं ते शोधता आलं पाहिजे आणि शोधून वाचता आलं पाहिजे अशी काहीतरी सोय करुया असं वाटलं. मग वाटलं, सॉफ्टवेअर कशाला, एक वेबसाईटच करूया आणि त्यावर स्वतःचं सगळं लिहिलेलं छान आर्काईव करून ठेवुया. मग ते आपल्यालाही वाचता येईल आणि लोकांनाही वाचता येईल.
तेंव्हा ब्लॉग करून त्यावर सगळं लिखाण ठेवणं हा एक पर्याय होता, पण त्यात भरपूर तांत्रिक मर्यादा होत्या. आणि मला जे डोळ्यासमोर येत होतं ते डिझाईन आणि त्या सुविधा ब्लॉग मध्ये करणं शक्य नव्हतं.
तेंव्हा, म्हणजे दहा-बारा वर्षांपूर्वी, मराठीत वेबसाईट करायची तर फॉंट्सचा खूप प्रॉब्लेम यायचा. आपली वेबसाईट लोकांना दिसण्यासाठी त्यांना आपला फॉंट डाऊनलोड करून इन्स्टॉल वगैरे करायला लागायचा. ते बहुसंख्य लोकांना जमत नसल्याने मराठीत वेबसाईट बनवण्याचा उद्योग फार कोणी करायचं नाही. तेंव्हा प्रोप्रायटरी फॉंट्स जाऊन जगातल्या सर्व भाषांमध्ये कम्प्युटिंग करता यावं यासाठी युनिकोड फॉंट्स येऊ घातले होते. आपली साईट future proof करण्यासाठी युनिकोड फॉंटमध्येच करायची असं ठरवलं.
बेसिक HTML पानं तयार करून त्याची वेबसाईट कशी करायची हे तंत्रज्ञान मला तेंव्हा माहित होतं. पण ज्यात शोध घेता येईल, सहज नवं साहित्य प्रकाशित करता येईल, लोकांना कमेंट्स करता येतील वगैरे सारख्या सुविधा हव्या असतील तर बेसिक HTML च्या पानांनी बनलेली वेबसाईट करण्यात काही अर्थ नव्हता. ज्यात डेटाबेस आहे आणि हव्या त्या सुविधांचं प्रोग्रॅमिंग करता येईल अशी डायनॅमिक वेबसाईट करायची असं ठरवलं.
तेंव्हा डेटाबेस म्हणजे Microsoft चं MSSQL किंवा Oracle आणि वेबसाईटच्या प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज म्हणजे ASP किंवा Java असे प्रमुख पर्याय होते. यातलं मला काही येतही नव्हतं, त्यांची लायसन्सची किंमतही अवाच्यासवा होती आणि मुख्य म्हणजे यातले कुठलेच पर्याय 'युनिकोड मराठी’ सपोर्ट करत नव्हते. म्हणजे हे पर्याय बादच होते...
तेंव्हा मायबोली डॉट कॉम सारखी दुसरी एक मराठी साईट लॉंच झाली होती. ती युनिकोड मराठी मध्ये होती. मला आशेचे किरण दिसले. त्या साईटच्या मालकांना मेल केली आणि युनिकोड मध्ये मराठी साईट कशी करायची? तुम्ही कोणतं सॉफ्टवेअर वापरलं आहे वगैरे प्रश्न विचारले. त्यांनी त्या मेलला उत्तर द्यायचीही तसदी घेतली नाही!!
मग जरा शोधा शोध केल्यावर ती साईट ‘द्रुपल’ नावाच्या सॉफ्टवेअरमध्ये केली आहे असं समजलं. मग अजून शोधाशोध केल्यावर द्रुपल ही एक नवी मुक्तस्रोत Content Management System आहे आणि ती युनिकोड मधले सर्व फॉंट्स (सर्व भाषा) सपोर्ट करते असं समजलं. मग द्रुपलच्या साईटवर जाऊन द्रुपल डाऊनलोड केलं. त्यांचं डॉक्युमेंटेशन वाचत वाचत आपल्या मशीनवर ते इन्स्टॉल केलं. अर्थातच डीफॉल्ट इंग्लीश वेबसाईट तयार झाली. आता यात मराठी साहित्य टाकून मराठी साईट कशी करायची हा प्रश्न आला.. पुन्हा त्या नव्या मराठी साईटच्या मालकांना इमेल केली. द्रुपलमध्ये मराठी साईट कशी करायची हा प्रश्न विचारला. पुन्हा एकदा त्यांनी मला काहीही उत्तर दिलं नाही.!! तेंव्हा द्रुपलच्या डॉक्युमेंटेशनमध्ये कुठेही मराठी, हिंदी किंवा इतर भारतीय भाषांविषयी काहीही माहीत नव्हती. पुन्हा अडलो.
मग ठरवलं आपलं आपण ट्रायल आणि एरर करून करुन बघुया. मग कंबर कसून प्रयोग करायला लागलो आणि माझी द्रुपलगिरी सुरु झाली!!