जेंव्हा मी मांडलं माझ्या लाडक्या देशाचं भवितव्य
तरल, गहिऱ्या शब्दांतल्या कवितांमध्ये
लोक म्हणाले, कोण हा बावळट कवी?
काय लिहितोय हे टपराट…..
मग मी मांडून पाहिली सत्यं
आकडे, संख्या, समीकरणं मांडून
गणिताच्या भाषेमध्ये
तेंव्हा म्हणाले तेच लोक
'काय आईनस्टाईन समजतो का स्वतःला?
किती किचकट लिहितो च्युत्या....'
मग मी थांबलो,
विचार करायला लागलो....
कदाचित असंही असेल
ज्यांना प्रश्न पडतात,
प्राण कासावीस करणारे,
त्यांना जमत असेल व्यक्त होणं
कवितेतूनही, गणितांमधूनही
आणि ज्यांना पडतच नसतील प्रश्न
किंवा पडूनही नाकारत असतील
जे मूलभुत, जीवघेणे प्रश्न
त्यांना नकोच असतील उत्तरं
कवितेतूनही, गणितांमधूनही.....
मग मी थांबलो,
पुन्हा विचार केला
मग वाटलं.....
पण या सगळ्यानी काहीच फरक पडत नाही
शेवटी देश म्हणजे माणसं
माणसांची संख्या.....
कुठली संख्या मोठी आहे?
प्रश्नं पडणऱ्यांची.....
की उत्तरंच नको असणाऱ्यांची?
कवितेतूनही, गणितांमधूनही....
आणि जर उत्तरंच नको असणाऱ्यांची
संख्या मोठी असेल या देशात
तर मुळात प्रश्नच कशाला मांडायचे
कवितेतूनही, गणितांमधूनही....!!