सिद्धार्थ

प्रसाद शिरगांवकर

एका भल्या पहाटे
एेश्वर्य ओसंडून वहाणाऱ्या महालात
निवांत निजलेल्या आपल्या बायको आणि मुलाकडे
शांतपणे पाठ फिरवून
सत्याचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला
तेंव्हाचा सिद्धार्थ

आणि
रोज पहाटे
आपल्या आलिशान अपार्टमेंट्समधे
निवांत निजलेल्या आपल्या बायको आणि मुलाकडे
शांतपणे पाठ फिरवून
संपत्तीचा शोध घेण्यासाठी बाहेर पडणारे
आजचे लाखो करोडो सिद्धार्थ

‘सिद्धार्थ'पण तेच,
शोध मात्र
तेंव्हा सत्याचा, आता संपत्तीचा...

लागलाही असेल सत्याचा शोध
तेंव्हाच्या सिद्धार्थाला…. कदाचित
लाभतही असेल अफाट संपत्ती
आजच्या सिद्धार्थांना…. कदाचित

पण दुरावलं गेलं कुटुंब सिद्धार्थाचं तेंव्हाही….
दुरावलं जातं ते आजही…

तगमग करून मिळवतातही हे सिद्धार्थ
सत्य किंवा संपत्ती… कदाचित

पण हरवून बसतात कुटुंब
कायमचे…. कदाचित...

Average: 8.6 (10 votes)