तारकांपल्याड आहे जायचे
चांदण्यांचे गीत आता गायचे
कालचे गेले उन्हाळे संपुनी
पावसाने धुंद आता व्हायचे
अंगणी माझ्या फुलोरा हा तुझा
पारिजाताच्या फुलांनी न्हायचे
जाहलो आहे असा कापूर मी
स्पर्शता तू मी असे पेटायचे
घातली आहेत ऐसी माळ तू
श्वास माझे ज्यात मी गुंफायचे