घोळक्याने...

प्रसाद शिरगांवकर

येतात घोळक्याने, जातात घोळक्याने
आयुष्य का असे हे जगतात घोळक्याने

कोणीच येत नाही जीवास वाचवाया
प्रेतास जाळण्याला जमतात घोळक्याने

संसर्गजन्य आहे सारीच आग यांची
जळतात घोळक्याने, विझतात घोळक्याने

कोणीच कोण नाही येथे जरी कुणाचा
सारेच घोळके का झुरतात घोळक्याने

व्युहास भेदुनी या जाउ नकोस राजा
व्युहात एकट्याशी लढतात घोळक्याने

Average: 7.8 (8 votes)