सोबत असले... नसले कोणी...

प्रसाद शिरगांवकर

मैफलीत या बसले कोणी
हसले कोणी, रुसले कोणी...

म्हणे भेटण्या झुंबड झाली
मला कसे ना दिसले कोणी?

जमेल तितके अमृत द्यावे
जरी कितीही डसले कोणी...

का घटना या उलट्या सुलट्या?
डाव क्षणांचे पिसले कोणी?

सुगी कुणाच्या घरात आली?
शेत कुणाचे? कसले कोणी?

पुन्हा नव्याने लिहितो आहे...
ललाट माझे पुसले कोणी...

एकटाच मी चालत आहे...
सोबत असले... नसले कोणी...

Average: 7.1 (47 votes)