मी पुढच्या तासाभरात मरण्याची शक्यता किती आहे?
जवळपास शून्य!
दिवसा-दोन दिवसात?
शून्याच्याच जवळपास!
महिन्याभरात? वर्षभरात?
शून्याहून थोडी मोठी, पण शून्यच समजू
दहा-वीस वर्षांत?
हूं… कदाचित…
थोडिशी आहेच शक्यता मरण्याची या काळात…
आजपासून तीस-चाळीस वर्षांत?
खूपच जास्त… हेच तर वय असतं मरायचं!
पन्नास-साठ वर्षांत?
नक्की, अगदी नक्की! ह्याहून जास्त कोणी जगतच नाही यार…
पण मग, नक्की किती काळ आहे माझ्यापाशी?
किती तास, दिवस, महिने, वर्ष?
आणि काय करायचं मी या काळात?
घाबरत जगायचं मरणाला?
का प्रेम करत जगायचं…. जगण्यावरच!
नाकारत रहायचे जगाचे सारे ऋतू,
अटळ मरणाच्या भीतीनं
का फुलवत रहायच्या फुलबागा,
जगण्यावरच्या अगाढ प्रीतीनं...
जगावं का असं आयुष्य
ज्याचा प्रत्येक क्षण
मरणाच्या भीतीनं भरलेला
का असावं असं आयुष्य जिथे
जगण्याचा उन्मुक्त प्राजक्त
सदैव असतो बहरलेला
निर्णय फक्त माझा आहे
कारण आयुष्यही माझं आहे
चाळीसेक मिनिटांचं…. किंवा चाळीसेक वर्षांचं….