प्राण ओसरायचाच आज ना उद्या
देह हा जळायचाच आज ना उद्या
वात थोडकी तसेच तेल थोडके
दीप मंद व्हायचाच आज ना उद्या
घे गड्या, फुलून घे, वसंत दाटला...
हा ऋतू सरायचाच आज ना उद्या
आवरावया हवीस प्यास चातका
मेघ ओसरायचाच आज ना उद्या
मोजलेस तू मनात आकडे किती
अर्थ शून्य व्हायचाच आज ना उद्या
घट्ट सोबती असो तुझा कुणी किती
हात तो सुटायचाच आज ना उद्या
भासते तुझेच गीत गुंजते नभी
सूर हा विरायचाच आज ना उद्या