मिठीतही का सखे दुरावे?

प्रसाद शिरगांवकर

कळे न का हे असे घडावे
मिठीतही का सखे दुरावे?

झरे स्मृतींचे विरून गेले
उरी ऋतूंनी कसे फुलावे?

हृदय न ठावे मलाच माझे
कशास ठेवू तुलाच नावे

उधाण गेल्यावरी किनारी
तुझे नि माझे ठसे उरावे

असे कसे हे खुळे निखारे
कधी जळावे, कधी विझावे

ललाटरेखा अशी असावी
जसे हवे ते अम्ही लिहावे!

कशास येती अता छळाया
उजाड रानी उदास पावे

पराग व्हावे कधीतरी मी
उजेड प्यावा... मिटून जावे

Average: 8.5 (25 votes)