मी युध्द हारलो नाही

प्रसाद शिरगांवकर

मी कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही
मी कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही

अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो
अन कधीच आभासांच्या वार्‍याने विझलो नाही

मी तुला शोधण्यासाठी शून्यात मिळविली शून्ये
पण तुझ्यात मिसळुन जाता मी बाकी उरलो नाही

पुस्तकात अडकुन पडल्या पानासम मी दुर्दैवी
चैत्रात बहरलो नाही, ग्रीष्मात निखळलो नाही

साराच जीव माझा मी काव्यात ओतला होता
(म्हणून) निष्प्राण मैफलीसाठी हृदयातुन झरलो नाही

का मिठीत येतानाही दोघांत दुरावा भासे
का बोलुन इतके आपण, काहीच बोललो नाही

बागेस तुझ्या जाताना जो शब्द देउनी गेलो
तो अजून रुजला नाही, मी अजून फुललो नाही

श्वासांत श्वांस असताना मी लढतच गेलो म्हणुनी
हारून लढाया सार्‍या, मी युध्द हारलो नाही

Average: 6.4 (9 votes)