तुझिया त्या स्पर्शपुरांचा मी हिशोब लावत आहे
जळलेल्या रातदिनांचा मी हिशोब लावत आहे
बेटावर येऊन गेले या कितीक वेडे वारे
दरवळल्या स्वप्नक्षणांचा मी हिशोब लावत आहे
वाराही सांगत आहे हा तुझ्या नि माझ्या गोष्टी
हळव्या त्या खिन्न कथांचा मी हिशोब लावत आहे
जगण्याला ओवत होतो भंगुर श्वासांचे मोती
अद्याप सुन्या श्वासांचा मी हिशोब लावत आहे
चैत्रात नव्या पर्णांचा मज कधीच नव्हता शालू
ग्रीष्मात उभ्या फांद्यांचा मी हिशोब लावत आहे
स्वप्नांच्या आभाळावर अंधार सदा साकळला
आकांक्षांच्या पंखांचा मी हिशोब लावत आहे