एखादी तरी सर...

प्रसाद शिरगांवकर

दूर निघून जाण्यापूर्वी
एवढं तरी कर
अंगणात माझ्या घेऊन ये
एखादी तरी सर...

तुझ्या सरीनं पुन्हा एकदा
भरून जाऊदे अंगण
तुझ्या पुरानं पुन्हा एकदा
वाहुन जाऊदे कुंपण

पसरून माझे हात पुन्हा
झेलीन तुझ्या गारा
श्वासामध्ये भरून घेईन
सळाळणारा वारा

ओसरून जाता सर तुझी
दूर निघून जाशील
ओल्याचिंब तुझ्या आठवणी
मागे ठेऊन जाशील

जेंव्हा जेंव्हा आठवेल तुझी
दुरावलेली सर
आठवणींचा पाऊस येईल
भिजवून जाईल घर....

Average: 8.7 (104 votes)