एकच अंतिम सत्य...?

प्रसाद शिरगांवकर

एका प्रसन्न सकाळी
टेरेसमधल्या जास्वंदाला आलेलं
टपोरं पिवळटसर केशरी फूल आणि त्यावरले दवबिंदू बघून
सुचायला लागतं काहीतरी
'पाकळ्यांवरी अवघडलेले दवबिंदूंचे मोती' वगैरे

एवढ्यात माझा मुलगा तिथे येतो,
तो ही ते फूल बघतो
'वॉव बाबा, कालच शाळेत सांगितलं
सरफेस टेन्शनमुळे पाण्याचे ड्रॉप्स बनतात
बघा त्या फुलावर आहेत...
काय सॉलिड ना!'

बायकोही येते
ती ही ते फूल बघते
'आहा! तुला सांगत होते ना
तो हाच केशरी रंग
अशीच साडी बघितली परवा मी
काय मस्त आहे ना!'

एका साध्या फुलामध्ये
एकाच घरातल्या तिघांना दिसणारी
तीन वेगळी सत्यं!
आणि आपण
या अफाट विश्वाच्या पसाऱ्यात
एकच अंतिम सत्य
उगाच शोधत बसतो कधी कधी...

No votes yet