एवढेच की, घेता यावे
रोज सुखाने श्वास
एवढेच की, रोज मिळावे
दोन सुखाचे घास
हव्या कशाला उंची गाड्या
उंची सदरे, उंची साड्या
कशास जातो बांधत आपण
माड्यांवरती चढत्या माड्या
कशास इतका आटापीटा
कशास अट्टाहास?
एवढेच की रोज मिळावे
दोन सुखाचे घास
जे जे येथे जमवायाचे
इथेच असते सोडायाचे
काय मिळाले काय निसटले
फुका कशाला तोलायाचे?
निसटुन जे जाणार तयाचा
कशास हा हव्यास?
एवढेच की रोज मिळावे
दोन सुखाचे घास
घरात आपल्य भरून जावे
सळसळणारे वारे
अन घरट्याचे छप्पर व्हावे
चमचमणारे तारे
अंगणातही भरून जावा
प्राजक्ताचा वास!
एवढेच की रोज मिळावे
दोन सुखाचे घास