छेडतो जेथे कुठे मी सूर माझा
लोटतो गावात सार्या पूर माझा
भांडतो आहे अता मी वादळाशी
वेगळा आहे अताशा नूर माझा
पान जे होते पुराणे गप्प झाले
बोलतो आहे नवा अंकूर माझा
तोडुनी सार्या पुराण्या बंधनांना
अश्व आता धावतो चौखूर माझा
चेतनादायी तुझ्या स्पर्शास राणी
जीव आहे आजही आतूर माझा
पेटला आहे सुरांच्या संगतीने
आरतीसाठी तुझ्या कापूर माझा