सुचायचे ते सुचून झाले
सुचायचे ते सुचून झाले
लिहायचे ते लिहून झाले
अता खुलासे कशास देता
करायचे ते करून झाले!
वैयक्तिक
सुचायचे ते सुचून झाले
लिहायचे ते लिहून झाले
अता खुलासे कशास देता
करायचे ते करून झाले!
आरशात चंद्रही दिसायचा कधी...
अंतरात सूर्यही जळायचा कधी...
राहुनी सुखांत शोधतो सुखे अम्ही
वारुळात वाल्मिकी रहायचा कधी...
ओठ जैसे बासरीसाठी
शब्द माझे मैफलीसाठी
स्पंदनांच्या रोजच्या वार्या
ज्ञानियाच्या पालखीसाठी
कळे न का हे असे घडावे
मिठीतही का सखे दुरावे?
झरे स्मृतींचे विरून गेले
उरी ऋतूंनी कसे फुलावे?
मी कधीच भूकेपोटी पाठीत वाकलो नाही
मी कधीच लाचारांच्या पंगतीत बसलो नाही
अंधार उजळण्यासाठी शब्दांच्या ज्योती झालो
अन कधीच आभासांच्या वार्याने विझलो नाही
किती कितीदा समुद्र व्हावे सखीमुळे
किती कितीदा उधाण यावे सखीमुळे
तशी न माझी मुळे कधी रोवली कुठे
तृषार्त आत्मा उनाड धावे सखीमुळे
जीवनामध्ये कितीही टाळली स्पर्धा...
हाय, माझ्या पाचवीला पूजली स्पर्धा
गात होतो मी सुखाने माझियासाठी
सूर मग आले दुज्यांचे, लागली स्पर्धा
तुझिया त्या स्पर्शपुरांचा मी हिशोब लावत आहे
जळलेल्या रातदिनांचा मी हिशोब लावत आहे
बेटावर येऊन गेले या कितीक वेडे वारे
दरवळल्या स्वप्नक्षणांचा मी हिशोब लावत आहे
पाहून माणसांना बुजतो अजून मी
गर्दीत एकट्याने जगतो अजून मी
सौद्यात जीवनाच्या हरलो कितीकदा
बाजार मांडताना दिसतो अजून मी
माझिया भाग्यात साधी धूळ नाही
हाय, या मातीत माझे मूळ नाही
या पुढे जाईन कोठे काय पत्ता
आगगाडीला जिवाच्या रूळ नाही