आकाश भारलेले सारे सरून गेले
तारे विझून गेले, वारे विरून गेले
घनघोर पावसाला बोलावले कितीदा
शेतास थेंब थोडे ओले करून गेले
तू ठेवलीस कोरी माझी ललाटरेखा
आयुष्य हे तरीही माझे तरून गेले
आता नको नकोशा का वाटतात लाटा
सारे उधाण राणी का ओसरून गेले
जे पाहिजे मला ते कोणी कधी विकेना
कित्येक फेरिवाले दारावरून गेले
विश्वात दाटलेला अंधार दूर होण्या
वेडे कुणी मशाली हाती धरून गेले
पाहून जीवघेण्या दुःखात हासताना
जे सांत्वनास आले, मागे फिरून गेले
नाहीच एकमेकां शब्दांतुनी कळाले
मौनातले निखारे भिंती चिरून गेले