प्राजक्ताचं शल्य...

प्रसाद शिरगांवकर

पहाट जस जशी ओसरत जाते
तसा माझा फुलोरा बहरतच जातो
फुलून जातो मी अस्मानी गंधानं
आणि भारून टाकतो सारा परिसर

मग एखादीच वार्‍याची
हलकीशी झुळुक येते
आणि माझी शेकडो नाजुकशी लेकरं
माझ्या अंगाखांद्यावरून जमिनीकडे झेपावतात
मग जमतो एक बहारदार सडा
पांढर्‍या केशरी स्वर्गीय रंगांचा
माझ्याच पायाशी

जरासं उजाडल्यानंतर
नेहमीचेच काही वाटसरू येतात
काही गंध वेचून नेतात
काही तसेच तुडवून जातात

दिवस जसजसा चढत जातो
पायाशी सडा तसाच रहातो
आणि माझ्या बहराचं निर्माल्य बघत
मी मुकाट उभा रहातो....

तिन्हीसांजेला मला रोजच वाटतं
राहून राहून हृदयामधे दाटतं...

बहरून जाऊन अनावर होणं
याहून वेगळं पाप नाही
कारण
आपल्याच बहराचं निर्माल्य बघणं
याहून मोठा शाप नाही...

Average: 8.5 (24 votes)