तुडुंब जेवण झाल्यावरती
ग्लानी यावी अपार
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार!
खिडक्यांवरती पडदे ओढुन,
गरगरणारा पंखा लावुन
अंगावरती ओढुन चादर,
सदैव व्हावे तयार...
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार
हापिसात दमछाक तुम्हाला
करायची तर करा
बोनस टोनस इंक्रिमेंटने
खिसे आपले भरा
आम्हास आमुचा आळस प्यारा
तुम्ही काय ते हुषार...
निवांत लोळत गादीवरती
जावी पुरी दुपार