पिणं असतं आगळा उत्सव
त्याचा उरूस होऊ नये
प्यायला नंतर आपला कधी
वकार युनूस होऊ नये
घरी बसून दारू प्यायचे
खूप सारे फायदे असतात
हॉटेलमधे , बिल भरायचे
काटेकोर कायदे असतात
आम्ही कधीच दारूमधे
दुःख आमचं बुडवत नाही
दारू नेहमी शुध्दच ठेवतो
भेसळ आम्हाला आवडत नाही
हवा तसा मी चालतो आहे
कोण म्हणतंय ' जातोय तोल ?'
माझ्या मित्रा , माझ्या इतकी
पचवून दाखव , नंतर बोल!
प्रत्येक पार्टीत आपण बोलवावे
काही ' न ' पिणारे मित्र
पार्टीनंतर आपल्याला आपल्या
घरी नेणारे मित्र
पिणाऱ्यांनी समाजाचा
कुठलाच कायदा पाळू नये
जेंव्हा , जिथे , जशी वाटेल
प्यायचा मोह टाळू नये
ग्लासी लागेल ते ढोसत असतो
पानी लागेल ते चरत असतो
जेंव्हा माझं बिल कोणी
दुसराच माणूस भरत असतो
काय होतंय , कुठे होतंय
काही केल्या कळत नाही
एकदातरी वेळ अशी
पिणाऱ्यांना टळत नाही
प्रत्येकानंच आपला आपला
जसा घ्यायचा असतो श्वास
तसा प्रत्येकानं आपला आपला
सांभाळायचा असतो ग्लास
- प्रसाद शिरगांवकर
(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)