कसा आज काव्यास यावा फुलोरा
सखे भोवताली, पसारा... पसारा...!
इथे ढीग आहे, तिथे ढीग आहे
जिथे पाहतो मी तिथे ढीग आहे
ढिगारे बघोनी मनाला शहारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...
पसार्यात ऐसा कसा वावरू मी?
इथे एकट्याने किती आवरू मी?
पसार्यात जाईल हा जन्म सारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...
कसा आवरावा, किती आवरावा
कुठे आवरायास प्रारंभ व्हावा
विचारात हा जीव आहे बिचारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...
अता हे ढिगारे सखे आवरूया
घराला अता ये सखे सावरूया
रचुया पुन्हा नेटकासा मनोरा
सखे भोवताली, पसारा... पसारा...
जरा आवरोनी अता हुश्श झाले
तरी हेच सारांश लक्षात आले
कितीही करावे, हटेना पसारा!
सखे भोवताली, पसारा... पसारा...
गुरूमंत्र आता जरा जाणुया हा
कितीही दिसुदेत, दुर्लक्षुया हा
पसारा पसारा पसारा पसारा
सखे भोवताली, पसारा... पसारा...
प्रसाद...
(कॉपी-पेस्ट व्यावसायिकांना विनंती... ही कविता स्वतःच्या कष्टानी ईमेलद्वारे इतरांना पाठवण्यास माझी काहीही हरकत नाही... मात्र असं करताना मूळ कवीचं (म्हणजे माझं) नाव या कवितेचा कवी म्हणून दिल्यास मी आपला आजन्म उपकृत राहीन!)