वैयक्‍तिक

वैयक्‍तिक

अधीर ओठ टेकता

अधीर ओठ टेकता जरी शहारतेस तू
मिठीत या सखे अशी कशास लाजतेस तू!

फुलून पारिजात हा उभा तुझ्याच अंगणी
उगाच लाजतेस अन सुवास टाळतेस तू

तुला न पाहता उनाड चंद्रही न मावळे
कशास 'चांदणे कुठे' असे विचारतेस तू?

अता कुठे जरा जराच रंगतेय ही निशा

Average: 7.6 (45 votes)

बंधने तोडू...

भूतकाळाची नकोशी बंधने तोडू
वर्तमानाशी नव्याने नाळ या जोडू

कालचे जे भूत होते कालचे होते
`काल' साठी मी सुखांचा `आज' का सोडू

रेखुया जे पाहिजे ते जीवनामध्ये
जी नकोशी सर्व पाने या चला खोडू

साकडे घालू नव्या आकाशगंगांना
नेहमीच्या खिन्ना वाटांना अता मोडू

आसमंताचा नव्याने वेध घेण्याला
भोवताली गुंफलेले कोष या फोडू

Average: 5.4 (5 votes)

फरिश्त्या...

तुझे बोलणे उरक अता
हवा येउ दे सरक अता!

तुझी बोलणे तुझ्या कृती
दिसे काहिसा फरक अता

हाय फरिश्त्या तुझ्यामुळे
जिंदगी जणू चरक अता

स्वर्ग लोपला दूर कुठे
दिसे विश्व हे नरक अता

कशा दावसी खिन्ना दिशा
ईश्वरास तू टरक अता!

Average: 4 (1 vote)

मुग्ध बोली

जायचे आहे कुठे ते स्पष्ट कोठे?
थांबलो आहे इथे ते इष्ट कोठे?

दूर मी लोटू कशी संदिग्धता ही
जन्मत: माझीच जी ती दुष्ट कोठे

जायचे नाही मला मी जात नाही
थांबण्यासाठी कशाचे कष्ट कोठे!

निर्णयाला वेळ थोडा लावणारी
मंद बुद्धी ही जरा, ही भ्रष्ट कोठे?

जाणतो आता जरा या जाणीवांना
अंतरीची मुग्ध बोली क्लिष्ट कोठे?

Average: 4 (1 vote)

दुसर्‍या कोणासाठी

उगाच रांधत, वाढत होतो दुसर्‍या कोणासाठी
उगाच उष्टी काढत होतो दुसर्‍या कोणासाठी

रांधत होतो ज्याच्यासाठी नव्हती त्याला पर्वा
मीच सुखाने राबत होतो दुसर्‍या कोणासाठी

Average: 7.3 (3 votes)

मांडलिक

होतो कधीतरी मी सम्राट अंबरीचा
मी मांडलीक आता चतकोर भाकरीचा

जे साठवून झाले, निसटून जात गेले
आला मला कधी ना अंदाज पायरीचा

गर्दीत भोवताली हे गारदीच सारे
अन शोधतो फुकाचा मी सूर बासरीचा

हे रक्त आटलेले, ते रक्त बाटलेले
रक्तास रंग नाही कोठेच खातरीचा

दाही दिशांस गेलो शोधात मी सुखाच्या
ना पाहिला कधीही मी सूर्य अंतरीचा

Average: 7.3 (6 votes)

तूच गा रे...।

भेटण्याला वाकले आभाळ सारे
सांग तू आतातरी येशील का रे?

धावुनी मागे तुझ्या वेड्याप्रमाणे
श्रांत आता जाहले बेभान वारे

सोडुनी ये तू तुझ्या आकाशगंगा
चांदणे गावातले या गंधणारे!

दाटला चोहीकडे अंधार तेंव्हा
तेवणारा तूच तू होतास ना रे?

धृपदे श्वासांत माझ्या ओवताना
अंतरेही जीवनाचे तूच गा रे!

Average: 8.3 (3 votes)

एकटा मी चालतो

थांबले केंव्हाच सारे, एकटा मी चालतो
सोबतीला फक्त तारे, एकटा मी चालतो

धाव घेण्यालायकीची एकही नाही दिशा
भोवताली खिन्न वारे, एकटा मी चालतो

Average: 9.2 (32 votes)

घरंदाज

कसा कैफ़ होता, कसा माज होता
व्यभीचार त्यांचा घरंदाज होता!

जरी पाठ माझी, तरी घाव झाला
सखा भेटला तो, दगाबाज होता

कसे आज ओठी सुचावेच गाणे
नव्या संभ्रमांना जुना साज होता

दुजा कोण घेई, दुज्याच्याच धावा
उभा जायबंदी फलंदाज होता!

पुन्हा ढाळती ते फुकाचेच आसू
सुखांचा उमाळा पुन्हा आज होता!

Average: 7 (1 vote)

मी उदंड सागरात...

आजही तुझ्या घरात थांबली तस्र्ण रात
आजही तस्र्ण चंद्र पेटतो तुझ्या उरात

का अशी तुझी मिजास, दूर लोटले नभास
ही अशी कधी कुणास भेटते न चांदरात

ठेवले किती जपून, श्वास श्वास मंतरून
ठेवतो तुझी मशाल पेटवून अंतरात

रोज तेच तेच रंग, तेच ते जुने तरंग
माझिया स्र्पास मीच पाहतोय आरशात

झेलुनी तुझे तणाव, चालते अजून नाव
भोगतो अजून राज्य मी उदंड सागरात

Average: 5 (1 vote)