वैयक्‍तिक

वैयक्‍तिक

मला न आले...

त्यांच्या ऋतुंप्रमाणे जगणे मला न आले
ते सांगतील तेंव्हा फुलणे मला न आले

हा चेहराच माझा या आरशात आहे
भलत्याच चेहर्‍यांना बघणे मला न आले

त्यांच्या भल्या सुखांच्या या लांब लांब रांगा
रांगेत कोणत्याही बसणे मला न आले

मारावयास आले त्यांना दिली फुले मी
साधे धनुष्य हाती धरणे मला न आले

जे जे घडावयाचे ते ते घडून गेले
विझणे तुला न आले, जळणे मला न आले

आयुष्य संपताना याचीच खंत आहे
माझ्या मनाप्रमाणे मरणे मला न आले

Average: 8.5 (4 votes)

निखारे थांबले होते...

भोवताली गाव सारे थांबले होते
दूर माझे खिन्ना वारे थांबले होते

वादळे झेलून गेलो मी कुण्या देशी
माझियासाठी किनारे थांबले होते

मंदिराचा उंबरा मी गाठला तेंव्हा
स्वागताला वाटमारे थांबले होते

आजही तूफान माझे रोखण्यासाठी
पुस्तकी काही उतारे थांबले होते

जाणिवांची आजही पेटे न शेकोटी
कोण जाणे का निखारे थांबले होते

कालची मैफील माझी रंगली ऐसी
लोक काही भांडणारे थांबले होते!

मद्यशाळा ती कधीची कोरडी झाली
रिक्त प्याले झिंगणारे थांबले होते

No votes yet

वेळच्यावेळी

पाहिजे ते सर्व केले वेळच्यावेळी
ना मला काही मिळाले वेळच्यावेळी

देत आहे मी तुला ही राखरांगोळी
मी जळोनी राख झाले वेळच्यावेळी

कौतुकासाठी कधी आले कुणी नाही
भांडण्याला लोक आले वेळच्यावेळी

का कळेना काळ माझा थांबला आहे
सूर्य आले, चंद्र आले वेळच्यावेळी

झिंगलो नाही कसा झोकूनही दारू
पीत होतो धुंद प्याले वेळच्यावेळी

या घड्याळाचे जरीही थांबले काटे
देत होतो मीच टोले वेळच्यावेळी

तापला होतास तू माझ्याच साठी रे
मी तुझा पाउस झाले वेळच्यावेळी

No votes yet

पदरात चांदणे घे

माझे जरा तरी तू ऐकून बोलणे घे
विझवून हे निखारे पदरात चांदणे घे

सारेच फेकुनी दे काटे उरातले तू
श्वासांत मोगर्‍याचे निष्पाप गंधणे घे

होवून लाट राणी आता मिठीत येना
तूफान सागराचे बेहोष झिंगणे घे

देवू नको निवाडा तूही जुना पुराणा
माझ्या जुन्या गुन्ह्यांची ऐकून कारणे घे

या अंगणात माझ्या आनंद शिंपतो मी
तूही अता ऋतुंनी आभाळ शिंपणे घे

Average: 8.2 (6 votes)

अक्षता

एवढी आहे सखे प्रेमार्तता माझी तुझी
आपल्या नात्यात होते पूर्तता माझी तुझी

थांबल्या आकाशगंगा थांबली तारांगणे
स्तब्ध सारे ही कहाणी ऐकता माझी तुझी

एकमेकांच्या सुरांचा स्वर्गही मागू अता
देत आहे मागतो ते देवता माझी तुझी

कालही का वादळे? ही आजही का वादळे?
वादळे येतात, स्वप्ने ऐकता माझी तुझी

लग्न हे होण्याचसाठी सज्ज या सार्‍या दिशा
या दिशा घेउन येती अक्षता माझी तुझी

Average: 6.5 (4 votes)

सोवळा

वेगळा आवाज माझा वेगळा माझा गळा
राहुनी गर्दीतही या राहतो मी वेगळा

बाटलेले सूर सारे आज माझ्या भोवती
त्या सुरांच्या मध्यभागी सूर माझा सोवळा

मी कधी मागीतली नाही तुझी तारांगणे
का तरीही भोगतो त्या तारकांच्या मी झळा

आजही तोडून गेले ते फुलांच्या पाकळ्या
आसवांनी सिंचतो मी आजही माझा मळा

राहिली माझी इथे ना राखही आता जरी
का पुन्हा दारात यावा हा भुकेला कावळा

Average: 7.6 (7 votes)

हृदयात या रुजले ऋतू

हृदयात या रुजले ऋतू
देहात या फुलले ऋतू

ही पालवी आली नवी
हे अंतरी सजले ऋतू

Average: 8.3 (43 votes)

नवे उठाव...

रोज वेगळेच नाव, रोज वेगळेच गाव
रोज वेगळे जमाव, रोज वेगळे तणाव

कालचा जुनाच माल, कालचाच हा दलाल
आज का नवीन भाव? आज का नवे लिलाव?

आरशात पाहतोय आज हे नवीन काय?
चेहरा असे जुनाच, हे नवीन हावभाव!

थांबलीय अंगणात ही नवीन चांदरात
मी अजून मांडतोय कालचे जुनेच डाव

घेतले लगाम मीच, जाहलो गुलाम मीच
बंड हे अता कशास? का अता नवे उठाव?

Average: 8 (5 votes)

गंगा...

वीष मी मस्तीत प्यालो
पिउनी मी धुंद झालो

चालण्याला वाळवंटी
घेउनी तारे निघालो

ना कळे माझे मलाही
मी कसा पाउस झालो

का मलाही आठवेना
काय मी मागे म्हणालो

का असे मी केवड्याचे
वाळलेले पान ल्यालो

भावना ओल्याच होत्या
कोरडे मी शब्द प्यालो

आसवांची रोज गंगा
आसवांनी रोज न्हालो

No votes yet

श्वासही आहे इथे...

कालही होतो इथे मी आजही आहे इथे
ध्येयही येथेच आहे वाटही आहे इथे

का धरू मी पालवीची आस माझ्या अंतरी
कालचे ते वाळलेले पानही आहे इथे

थोडक्या या चांदण्याने ये अता झिंगू जरा
चांदणी आहे इथे नी चंद्रही आहे इथे

बोलली मी अक्षरे ती धूळ सारी जाहली
लोपल्या धूळाक्षरांची धूळही आहे इथे

काय देवू मी पुरावा लाडके आता तुला
प्रेमरंगी रंगलेला श्वासही आहे इथे

No votes yet