दुसर्‍या कोणासाठी

प्रसाद शिरगांवकर

उगाच रांधत, वाढत होतो दुसर्‍या कोणासाठी
उगाच उष्टी काढत होतो दुसर्‍या कोणासाठी

रांधत होतो ज्याच्यासाठी नव्हती त्याला पर्वा
मीच सुखाने राबत होतो दुसर्‍या कोणासाठी

निवांत होता तो माझ्या पाठीवर टाकुन ओझे
विराट गाडा ओढत होतो दुसर्‍या कोणासाठी

कोण कुणाचा, कोण कोठला, कोण कुणाच्यासाठी
खुळीच नाती जोडत होतो दुसर्‍या कोणासाठी

मैफलीत लोकांच्या आणिक मैफलीत माझ्याही
सूर दुज्यांचे शोधत होतो दुसर्‍या कोणासाठी

Average: 7.3 (3 votes)