वेळच्यावेळी

प्रसाद शिरगांवकर

पाहिजे ते सर्व केले वेळच्यावेळी
ना मला काही मिळाले वेळच्यावेळी

देत आहे मी तुला ही राखरांगोळी
मी जळोनी राख झाले वेळच्यावेळी

कौतुकासाठी कधी आले कुणी नाही
भांडण्याला लोक आले वेळच्यावेळी

का कळेना काळ माझा थांबला आहे
सूर्य आले, चंद्र आले वेळच्यावेळी

झिंगलो नाही कसा झोकूनही दारू
पीत होतो धुंद प्याले वेळच्यावेळी

या घड्याळाचे जरीही थांबले काटे
देत होतो मीच टोले वेळच्यावेळी

तापला होतास तू माझ्याच साठी रे
मी तुझा पाउस झाले वेळच्यावेळी

No votes yet